हिंदुस्थानी कुमार संघाच्या माजी कर्णधाराचा अकस्मात मृत्यू, अवघ्या 29 वर्षी आला अटॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या कुमार संघाचा माजी कर्णधार अवी बारोट याचे अकस्मात निधन झालं आहे. तो अवघ्या 29 वर्षांचा होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने याबाबतची माहिती दिली आहे. अवी हा हरयाणा आणि गुजरातसाठीही क्रिकेट खेळला होता. 2019-2020 च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने बंगालवर विजय मिळवला होता. अवी हा विजेत्या सौराष्ट्र संघाचा त्यावेळी सदस्य होता. 15 ऑक्टोबरला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अवीचे निधन झाल्याचे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

उजव्या हाताने फलंदाजी करणारा अवी हा यष्टीरक्षक होता आणि तो फिरकी गोलंदाजीही करायचा. 2011 साली कुमार संघाचा कर्णधार असलेल्या अवी बारोटने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 53 चेंडूत 122 धावा फटकावल्या होत्या. अवी बारोटने 38 प्रथम दर्जाचे सामने खेळले असून त्याने अ दर्जाचे 38 आणि 20 देशांतर्गत T20 सामनेही खेळले आहेत.