कन्याकुमारीहून चालत कश्मीरला पोहोचलेले राहुल गांधी शंकराचार्यांनंतर दुसरेच, फारूक अब्दुल्लांची स्तुतिसुमनं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जवळपास 100 दिवसांपासून सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. ‘भारत जोडो यात्रा’ जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचली आहे. गुरुवारी रात्री राहुल गांधी यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी जम्मूमध्ये प्रवेश केला. यावेळी जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली.

राहुल गांधी यांच्या धैर्याचे कौतुक करताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, काही शतकांपूर्वी आदिगुरू शंकराचार्य येथे आले होते. तेव्हा रस्तेही नव्हते. शंकरायार्च जंगलमार्गे कन्याकुमारीहून चालत कश्मीरला पोहोचले होते. त्यांच्यानतर अशी यात्रा काढणारे राहुल गांधी दुसरेच आहेत. राहुल गांधी यांनी देखील कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रा काढली आणि ती कश्मीरमध्ये पोहचली आहे. जम्मू-कश्मीरच्या लखनपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

द्वेषाच्या राजकारणाविरोधात देशाला एकजूट करणे, तसेच गांधी आणि रामाचा हा देश असून येथे सर्व जण एक आहोत हे दाखवणे भारत जोडो यात्रेचा उद्देश असल्याचे फारूक अब्दुल्ला म्हणाले. देशात एकमेकांविरोधात द्वेष निर्माण केला जात असून धर्मा-धर्मात वाद निर्माण केला जात आहे. मात्र ही यात्रा देशाला एकजूट करण्याच्या इराद्याने काढण्यात आली आहे. या यात्रेला विरोध करणारे हिंदुस्थान, माणुसकी आणि लोकांचे शत्रू असल्याचे फारूक अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तानसोबत चर्चा होत नाही तोपर्यंत दहशतवाद जिवंत राहणार असेही फारूक अब्दुल्ला म्हणाले. चीनसोबत सुरू असलेल्या चर्चांच्या फेरीवरूनही त्यांनी केंद्राला घेरले. चीनसोबत चर्चा होते, मात्र पाकिस्तानसोबत नाही. मी स्वत:च्या रक्ताने लिहून देऊ शकतो की दहशतवाद जिवंत असून जोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा होत नाही तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही, असेही ते म्हणाले.