फडणवीसांनी घोषित केलेल्या एसआयटी चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा? माजी आमदार अनिल गोटे यांचा सवाल

मिंधे गटाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएचे धुळे वसुलीकांड शिवसेनेने उघडकीस आणले आहे. खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या शासकीय विश्रामगृहातील खोलीतून कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. मात्र आरोपींच्याच विनंती अर्जावर तपास एजन्सी बदला, असे आदेश देणाऱ्या फडणवीसांनी घोषित केलेल्या एसआयटी चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

किशोर पाटील यांनी शासकीय विश्रामगृह खोली क्रमांक 102 मध्ये पावणेपाच कोटी रुपये गोळा केले होते. यासंदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनाही चार वेळा फोन केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. फडणवीस यांना फोन केला. पण त्यांचा आवाज काही माझ्यापर्यंत पोहचला नाही. त्यांचे पी.एस. राजुरकर यांनी दहा मिनिटांत बोलणे करून देतो सांगितले. मात्र तीनवेळा होल्ड ठेवले. पण्, मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला नाही, असे गोटे म्हणाले.

सोमवारी जमीन घोटाळ्याचा भंडाफोड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याचा भंडाफोड सोमवारी सकाळी 10 वाजता धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन करणार आहे. शासनाची अधिग्रहित केलेली जमीन कशी बळकावली याचे पुरावेच आपण सादर करणार असल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

यामुळे फडणवीसांनी विश्वासार्हता गमावली

मी आमदार असताना पंचायतराज समितीचा सदस्य होतो. ही समिती धुळ्यात आली असता धुळे जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ माळी यांना पाच लाख रुपये देताना रंगेहाथ पकडून दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी मलाच समितीतून हटवले होते याची आठवण अनिल गोटे यांनी फडणवीसांना करून दिली आहे.

दादासाहेब रावल सहकारी बँक घोटाळा प्रकरणाच्या एसआयटी चौकशीत भाजपचे मंत्री असलेल्या जयकुमार रावल यांना आरोपी केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्या पत्नीचे बंधू रावल यांचे स्वीय सहाय्यक होते. त्यांच्यामार्फत याची माहिती रावल यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर सहआरोपींनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटीकडून तपास काढून घेण्याची विनंती केली. यानंतर फडणवीस यांनी अधिकाराचा गैरवापर करत एसआयटी तपास सीआयडीकडे सोपवला होता, असे गोटे म्हणाले.