
महाराष्ट्र राज्याचे अर्थ व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री तथा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. महादेवराव शिवणकर यांचे सोमवारी सकाळी ९ वाजता आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता साकरीटोला घाट, सालेकसा रोड आमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा विजय शिवणकर व संजय शिवणकर यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार प्रा. शिवणकर यांनी केली होती. त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना गोंदिया जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळेच कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प जिल्ह्यात आज तयार होऊन शेतकरी विकासात हात लावलेला आहे.
२६ जानेवारी १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी गोंदिया जिल्ह्याची घोषणा केली आणि १ मे १९९९ रोजीच गोंदिया जिल्हा अस्तित्वात आणून कार्यभार सुरु करीत गोंदिया जिल्हा निर्मितीचे ते खरे शिल्पकार ठरले. मात्र त्यांनी गोंंदिया जिल्ह्याचे श्रेय हे सर्वांच्या सहकार्यामुळेच झाले असे नेहमी सांगायाचे.
सोबतच गोंदिया मध्यभागी असल्याने विकासाकरीता गोंदियाचा विमानतळ खरा विकासमार्ग ठरु शकतो यासाठी सरकार व लोकप्रतिनिधींची भूमिका सकारात्मक राहिली तर आपण अनेक मोठ्या शहरांनाही मागे घालू शकतो असे त्यांचे विचार जिल्ह्याच्या विकासाप्रती होते.