
सुनील उंबरे । पंढरपूर
महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. ज्या कार्यकर्त्याबरोबर त्यांचा संवाद झाला ते मोतीराम चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन साळुंखे यांच्याबरोबर आपला अशा प्रकारचा संवाद झालेला नसल्याचा खुलासा केला. साळुंखे आणि चव्हाण या दोघांनी तो मी नव्हेचची भूमिका घेत आमचा हा आवाज नाही आमच्या राजकीय विरोधकांनी केलेले हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
ऑडिओ क्लिप बाबत अधिक खुलासा करताना साळुंखे म्हणाले या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हे प्रकरण पोलिसांकडे सोपविले आहे याची सखोल चौकशी करुन हे कटकारस्थान कोणी केले याचा शोध घेणार असल्याचे साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील उपस्थित होते.
चार दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती.त्यामध्ये जिल्हाध्यक्ष साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष घालण्याचे निर्देश केले होते. त्याप्रमाणे पक्षाने नोटीस दिल्याचे समजते यावर साळुंखे यांना विचारणा केली असता अद्याप नोटीस मिळाले नसल्याचे स्पष्ट केले.

























































