राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, ऑडियो क्लिप व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशेष प्रतिनिधी, सांगोला

सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी अशी मुक्ताफळे उधळली आहेत. राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष साळुंखे पाटील यांनी अतीशय गलीच्छ शब्दात शिवीगाळ केली आहे. त्यात त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दलही अवमानकारक शब्दप्रयोग केला आहे. दीपक आबा साळुंखे पाटीलांची फोनवरील संभाषणाची ऑडियो क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“शरद पवार आहेत तो पर्यत माझं कोणी सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. त्या ‘बाई’ला ****आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** कार्यकर्त्यांना मी भीक घालत नाही. कोणत्या **** राजीनामा द्यायचा आहे त्यांनी खुशाल द्यावा. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे. त्यामुळे पक्षाच्या महिला व इतर पदाधिकाऱ्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साळुंखे पाटलावर पक्षांचे ज्येष्ठ नेते काय कारवाई करतात, की त्यांना पाठीशी घालतात याकडे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.