
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते फायर फायटरच्या गणवेशात दिसत आहेत. टोनी अॅबॉट शुक्रवारी दक्षिण सिडनीच्या जंगलात आग विझविण्यासाठी गेले होते. ते अग्निशमन दलाला आग विझविण्यास मदत करत असताना हा फोटो क्लिक केल्याचा दावा केला जात आहे. टोनी अॅबॉट एक दशकाहून अधिक काळ स्वयंसेवक म्हणून रुलर फायर सर्व्हिसमध्ये काम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय टॉनी अग्निशमन दलाला मदत करत होते. त्यानंतर काही समर्थकांनी त्यांना एक फोटो काढण्याची विनंती केली, त्यांनी ती स्वीकारली. आता हाच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टोनी अॅबॉट हे 2013 ते 2015 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील 30 लाख एकरात पसरलेल्या आगीत आतापर्यंत सुमारे 700 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मदत करण्यासाठी 1700 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत. ही आग शहराच्या आसपास सुमारे 100 ठिकाणी पसरली आहे, ज्यामुळे या परिसरातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे. प्रशासनाने ‘न्यू साउथ वेल्स’च्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे, तर किनारपट्टीचे शहर सोहन हावेल रिकामे केले आहे.




























































