देशाबाबत निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती; प्रणव मुखर्जींनी टोचले कान

सामना ऑनलाईन । नागपूर

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी निमंत्रित केलं. या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि गुरुवारी अखेर ती प्रतिक्षा संपली. संघाच्या व्यासपीठावरून संघाच्या स्वयंसेवकांना उद्देशून बोलताना देशभक्ती आणि लोकशाही याबाबत मार्गदर्शन केलं.

‘वसुधैव कुटुंबकम् हा हिंदुस्थानी संस्कृतीचा पाया असून हिंदुस्थानला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे. विशेष बाब म्हणजे ही संस्कृती अद्यापही टिकून आहे ही गोष्ट गौरवशाली आहे’, असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं. विविधता हीच आपली ओखळ असली पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय प्रत्येकाने देशाबाबत निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. तसेच असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. देशातील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर बोलतांना असहिष्णुता, भेदभाव आणि तिरस्काराने हिंदुस्थानची ओळख धोक्यात येईल’, असा इशारा प्रणव मुखर्जी यांनी दिला.

‘लोकशाहीत जनता ही केंद्रस्थानी असली पाहिजे. सरकारचे लक्ष्य गरिबी दूर करणे व आर्थिक विकासातून विकास साधणे हे असले पाहिजे. देशात एकात्मता वाढीस लागावी व आनंदी वातावरण वाढावे हे धोरण तयार करताना लक्षात घ्यायला हवे’, असंही प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणातून सुचवलं.

आपली प्रतिक्रिया द्या