
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रिकचे रविवारी पहाटे निधन झाले. कर्करोगाशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. तो 49 वर्षांचा होता. 23 ऑगस्टला हिथ स्ट्रिकच्या मृत्यूची अफवा पसरली होती, मात्र दुर्दैवाने 12 दिवसांतच ही अफवा खरी ठरली.
हिथ स्ट्रिकची पत्नी नादिन यांनी ही माहिती दिली. पतीच्या निधनानंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली व आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘आज रविवार, 3 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांच्या वडिलांना देवदूत त्यांच्यासोबत राहण्यासाठी आमच्या घरातून घेऊन गेले. त्याला आपले शेवटचे दिवस या घरात कुटुंब आणि जवळच्या प्रियजनांसोबत घालवायचे होते. तो खूप प्रेमळ आणि शांततापूर्ण स्वभावाचा व्यक्ती होता. तो कधीही एकटा कुठे एकटा फिरायला जात नसे. माझं आणि त्याच नातं हे फक्त पती-पत्नीचं नव्हतं, तर आम्ही खूप चांगले मित्रदेखील होतो. आम्ही एकमेकांच्या मनात काय सुरू आहे हे न बोलता ओळखत होतो. आमचे शरीर जरी वेगळे असले तरी आत्मे अनंतकाळासाठी एक झाले होते. स्ट्रेकी, जोपर्यंत तू माझ्या आठवणीत आहेस, तोपर्यंत मनाने तू कधीही दूर जाणार नाहीस,’ या त्यांच्या पोस्टने क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठाव घेतला.
तत्कालीन संघसहकारी हेन्री ओलोंगाने 23 ऑगस्टला हिथ स्ट्रिकच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर टाकली होती. यानंतर स्ट्रिकने या अफवांचे खंडन करत आपण जिवंत असल्याचे सांगितले, मात्र आज हिथ स्ट्रिकच्या निधनाची ती अफवा खरी ठरली.

























































