
पुण्याच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व गाजवणारे, आंतरराष्ट्रीय नकाशावर पुणे शहराची क्रीडानगरी, अशी ओळख निर्माण करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. कलमाडी यांच्या निधनाने राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही काळापासून सुरेश कलमाडी आजारी होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मिरा, मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. कलमाडी यांचे पार्थिव ‘कलमाडी हाऊस’मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.



























































