ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून ४५,००० मतदारांची नावे वगळण्यात आली; TMC घरोघरी जाऊन पडताळणी करणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये सुमारे ४५,००० मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात अली आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसने (TMC) संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीची तपासणी करण्याची जबाबदारी आता टीएमसीने घेतली आहे. ‘लाईव्ह हिंदुस्थान’च्या वृत्तानुसार, पक्ष नेतृत्वाने बूथ-लेव्हल एजंट्स (बीएलए) यांना घरोघरी जाऊन वगळलेल्या मतदारांची नावे पडताळण्याचा आदेश दिला आहे.

याआधी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत भवानीपूरमध्ये एकूण २०६,२९५ मतदार होते. आता नवीन प्रारूप मतदार यादीत फक्त १६१,५०९ नावे नोंदवली गेली आहेत, म्हणजेच ४४,७८७ मतदार वगळण्यात आले आहेत. जे एकूण मतदारांच्या सुमारे २१.७ टक्के आहे.

टीएमसीने म्हटले आहे की, ते लवकरच दावे आणि हरकती प्रक्रिया सुरू करेल. या काळात स्थानिक नेत्यांना प्रभावित मतदारांसोबत उभे राहण्याचे आणि पडताळणी प्रक्रियेत त्यांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय पक्षाने कागदपत्रे, फॉर्म भरणे आणि सुनावणी प्रक्रियेत लोकांना मदत करण्यासाठी “मे आय हेल्प यू” नावाची मोहीम सुरू केली आहे. गरज पडल्यास स्वयंसेवक घरोघरी जाऊन मदत करतील असेही पक्षाने म्हटले आहे.