भंगार चोरताना पाहिले म्हणून जीव घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना प्रतिनिधी । ठाणे

चार महिन्यांपूर्वी शीळ डायघर येथे भंगार दुकानात झालेल्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना यूपीतून अटक केली आहे. भंगार चोरताना पाहिले म्हणून आरोपींनी सहकाऱ्याची हत्या करून यूपीत पलायन केले होते. जगनारायण वर्मा ऊर्फ जंगली, नंदराम वर्मा, प्रमोदकुमार वर्मा अशी अटक आरोपींची नावे आहेत, तर बडकाऊ पासवान हा आरोपी फरार आहे.

10 एप्रिल 2018 रोजी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्तरशीव भागातील भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या जमील ऊर्फ अंग्रेज नशीबदार खान याची रात्री झोपेत असताना हत्या झाली होती. चार महिन्यांपासून पोलीस खुनाचा तपास करीत होते. एक संशयीत आरोपी ताब्यात येताच खुनाला वाचा फुटली. जमील ऊर्फ अंग्रेज नशीबदार खान याने या चार आरोपींना गाडीतील भंगार चोरताना पाहिले होते. या चोरीची माहिती तो मालकाला देईल या भीतीने या चौकडीने त्याची झोपेतच निर्घृण हत्या केली.