
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जामखेड येथील 4 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 40 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 53 असून त्यापैकी आता 10 जणांवर उपचार सुरू असून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
नगरमध्ये आतापर्यंत एकूण 1750 व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1658 स्राव निगेटिव्ह आले तर 53 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. आता 40 व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या 9 रुग्ण बूथ हॉस्पिटल मध्ये तर 1 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. यांत पाथर्डी येथील 01, जामखेड येथील 01, संगमनेर येथील 1 आणि धांदरफळ येथील 7 रुग्णांचा समावेश आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ येथील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.























































