
हिंगणघाट येथील वणा नदीच्या काठावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन मुले बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. येथील कवडघाट येथे सकाळी काही महिला गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यात रिया भगत (35) ही महिला पण होती. तिचा मुलगा अभि (10) व मुलगी अंजना (13) हेही सोबत होते.
नदीपात्रात उतरलेल्या आईसोबत अभिही गेला होता. त्यावेळी नदीच्या प्रवाहाला वेग आल्याने अभि नदीत वाहून जाऊ लागल्याचे दिसताच, त्याची बहीण अंजना त्याला वाचवण्यासाठी धावली. मात्र ती सुद्धा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत असल्याचे पाहून तिची आई रिया हिने धाव घेतली. या तिघांनाही वाहताना पाहून नदी काठावर असलेल्या दिपाली मारोती भटे या महिलेनेही नदीत उतरून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने हे चारही जण प्रवाहासोबत वाहत गेले. नदीच्या पात्रात चार जण वाहून जात असल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस कर्मचारी रामदास चकोले यांनी नदीच्या पात्रात उडी घेऊन रिया भगत यांना पाण्याबाहेर काढले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांचे मृतदेह अद्यापपर्यंत हाती लागलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या चमूला पाचारण करण्यात आले. आमदार समीर कुणावर यांनी घटनास्थळी पोहोचून प्रशासकीय यंत्रणेला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

























































