चौघांना लाईफ गार्डनी वाचवले 

जुहू चौपाटी येथे समुद्रात बुडणाऱ्या चौघांचे लाईफ गार्डनी प्राण वाचवले आहेत. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्या चौघांना पुढील कारवाईसाठी सांताक्रुझ पोलिसांच्या स्वाधीन केले.

गोरेगाव येथील रहिवासी असलेले तीन जण जुहू चौपाटीवर आले. ते तिघे पोहण्यासाठी समुद्रात गेले. त्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हा प्रकार गस्तीवर असलेले लाईफ गार्ड मनोहर शेट्टी, सोहिल मुलांनी, संतोष तांडेल, संदीप मोरे आणि अभिजित मेहेर यांच्या लक्षात आला. लाईफ गार्डनी समुद्रात धाव घेऊन त्या तिघांना सुरक्षित बाहेर काढले. याची माहिती सांताक्रुझ पोलिसांना दिली. त्या तिघांना वाचवल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अल्पवयीन मुलालादेखील लाईफ गार्डने वाचवले आहे. गोरेगावचा रहिवासी असलेला तो मुलगा आज त्याच्या कुटुंबीयांसोबत जुहू चौपाटी येथे आला होता. तो मुलगा पोहण्यासाठी समुद्रात गेला. त्याला अंदाज न आल्याने तो बुडू लागला. याची माहिती समजताच लाईफ गार्डने समुद्रात धाव घेऊन त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले.