मुक्रमाबादमधील आगीत चार घरे जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुक्रमाबाद

मुक्रमाबादजवळ असलेल्या हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्रीनंतर चार शेतकरी कुंटूबांच्या घरांना अचानक आग लागली. त्यात चारही घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत घरातील सर्व धान्य, कपडे, पैशासह संसारोपयोगी साहित्यही खाक झाल्यामुळे ऐन दुष्काळात एकाच कुंटूबातील चौघांचे संसार उघडयावर आले आहेत. सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित कुटुंबांनी केली आहे.

मुखेड तालुक्यातील हाळणी येथील जुन्या गावात राहणारे हणमंत यादवराव नामाजी, प्रकाश यादवराव नामाजी, विलास यादवराव नामाजी, पुष्पा नारायण नामाजी या एकाच कुंटूबातील शेतकरी कुंटूब आहे. या सर्वांची घरे जवळजवळ आहेत. हाळणी येथील नवीन वस्तीवाढ येथे बाळु मामा मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. याठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी घरातील महिला, पुरुष गेले होते. घरातील काहीजण अंगणात झोपले होते. मंगळवारी रात्री उशीरा या चार शेतकरी कुंटूबांच्या घरांना अचानक आग लागली. आगीने झपाट्याने रौद्ररुप धारण केल्याने चारही घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी घरातील धान्य, कपडे, पैसे व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ऐन दुष्काळात या चार शेतकऱ्यांच्या कुंटूबांचे संसार उघडयावर पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तलाठी एम.जी.जमदाडे यांनी घटनस्थळी पंचनामा करुन अहवाल तात्काळ तहसीलदारांकडे पाठवून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी दत्ता पाटील, गोपाळ पाटील, हणमंत मलापुरे, जळबा देवकत्ते, काशीनाथ राठोड महसुली पंच म्हणून उपस्थित होते.