
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ (India AI Impact Summit 2026) दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन केले. यातच आता काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युथ काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांनी ऑनलाइन नोंदणी करून आणि क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून परिषदेत प्रवेश मिळवला होता. त्यांनी सुरुवातीला टी-शर्टवर स्वेटर आणि जॅकेट घातले होते, ज्यामुळे त्यांच्याकडे असलेले संदेश सुरक्षा तपासणीत लक्षात आले नाहीत. हॉल क्रमांक ५ जवळ पोहोचताच या कार्यकर्त्यांनी अंगावरील कपडे काढून ‘PM is Compromised’ असे लिहिलेले टी-शर्ट फडकावत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
घटनेनंतर कारवाई करत टिळक मार्ग पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील युथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कृष्णा हरी आणि कुंदन यादव यांचा समावेश आहे. या सर्वांना आज पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार असून, पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, याआधी युथ काँग्रेसने या आंदोलनाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले होते. “पंतप्रधान मोदींनी या एआय समिटमध्ये देशाची ओळख आणि डेटाचा व्यापार केला आहे,” असा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार आणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आले होते.


























































