डोंबिवली, कळवा, मुंब्रा स्थानकांत रेटारेटी,धावत्या लोकलमधून चौघे कोसळले, तिघींना भोवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

गेले तीन दिवस आधीच पावसाने बारा वाजवले असतानाच मध्य रेल्वेने बुधवारी चाकरमान्यांचे तीनतेरा वाजवले. प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता आज मरेने अचानक रविवारचे वेळापत्रक चालवले. वेळापत्रक बदलल्याची कोणतीही माहिती नसलेले चाकरमानी सकाळी आपापल्या वेळेची लोकल पकडण्याकरिता रेल्वे स्थानकावर धडकले आणि डोंबिवली, कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ उडाला. प्रवाशांच्या झुंडीच्या झुंडी फलाटावर आल्याने तुफान गर्दी आणि प्रचंड रेटारेटी झाली. या गर्दीमुळे मुंब्रा-कळवादरम्यान एका महिलेसह चार प्रवासी लोकलमधून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. ठाणे स्थानकावर दोन महिला तर घाटकोपरमध्ये एक महिला भोवळ येऊन कोसळल्या. तर घाटकोपर स्थानकात लोकल प्रवेश करत असतानाच लेडिज डब्यावर झालेल्या दगडफेकीत महिला जखमी झाली. मध्य रेल्वेच्या या जीवघेण्या कारभाराविरोधात प्रवाशांच्या  संतापाचा भडका उडाला असून पुन्हा एकदा एलफिन्स्टन घडवून आमचा जीव घ्यायचा आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

…आणि ‘मरे’चे डोके ठिकाणावर आले

वेळापत्रक बदलल्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या जिवाशी खेळ होत असतानाच रेल्वे अधिकारी मात्र ढिम्म होते. प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठू लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसू लागताच अखेर ते खडबडून जागे झाले आणि सकाळी 11 नंतर त्यांनी रविवारचे वेळापत्रक बदलून नियमित वेळापत्रक जारी केले. तोपर्यंत लाखो प्रवासी अक्षरशः भरडून निघाले होते.

पावसाने प्रचंड झोडपल्याने मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. मात्र मंगळवारी दुपारपासूनच पावसाने विश्रांती घेतली आणि कडकडीत ऊनही पडले. पाऊस नसतानाही मध्य रेल्वेने अचानक बुधवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार गाडय़ा चालवण्याचा तुघलकी निर्णय घेतला. याचा जबरदस्त फटका लाखो चाकरमान्यांना बसला. वेळापत्रक बदलण्याची कोणतीही माहिती अथवा उद्घोषणा मध्य रेल्वेने केली नव्हती. त्यामुळे रोजच्या लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांच्या झुंडीच्या झुंडी रेल्वे स्थानकावर आल्या. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी उसळली.

म्हणून लोकल रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे!

ट्रकवर प्रचंड पाणी आल्याने मध्य रेल्वेच्या 26 लोकल विविध ठिकाणी अडकून पडल्या होत्या. त्यापैकी 24 लोकलच्या मोटर पाण्यात भिजल्याने त्या बिघडल्या. त्यामुळेच पर्जन्यवृष्टीचा हवाला देत मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक राबविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज नेहमीप्रमाणे प्रवासी 43 लाख, पण लोकलच्या 350 फेर्‍या कमी. मध्य रेल्वेचा हा अनागोंदी कारभार प्रवाशांच्या जिवावर बेतला.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या!

रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नुकतीच महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफचे अधिकारी, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक घेतली. रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, असे सांगत ज्या ठिकाणी दगडफेक होते अशा जागा निश्चित करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलीस यंत्रणा व रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये समन्वय ठेवून शीघ्र कृती दलामार्फत कारवाई करावी असेही निर्देश नीलम गोर्‍हे यांनी बैठकीत दिले.

गर्दीमुळे ते चौघे डब्याबाहेर फेकले गेले

खचाखच भरून जाणार्‍या लोकलचे दरवाजेही गर्दीने फुगले होते. त्यामुळे मुंब्रा ते कळवा या मार्गावर धावत्या लोकलमधून डब्याबाहेर फेकले गेल्याने नाझमीन शेख, नजीर शेख, निखिलेश कुबल आणि आणखी एक प्रवासी टॅकवर कोसळले. सुदैवाने लोकल धिम्या गतीने असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र नाझमीन शेख यांच्या हाताला, पायाला आणि मानेला मार लागला. नजीरच्या पायाला मोठी दुखापत झाली. तर निखिलेशच्या डोक्याला मार लागला. आणखी एक तरुण लोकलमधून कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र त्याचे नाव कळू शकले नाही.

या चारही जखमी प्रवाशांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात नजीर शेख आणि निखिलेश कुबल यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. तर नाझमीन शेख यांना मोठय़ा दुखापती झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. ठाण्यातही झालेल्या प्रचंड गर्दीमुळे श्वास कोंडून दोन महिला फलाटावरच भोवळ येऊन कोसळल्या. त्यांना तातडीने रेल्वे स्थानकावरच असलेल्या वन रूपी कॉइन उपचार केंद्रात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

समीक्षा चाळके यांच्या पोटावर दगड आदळला

डोंबिवली येथे लोकलने प्रवास करणार्‍या  आशा पाटील या महिलेवर दारूची बाटली फेकून मारल्याची घटना ताजी असतानाच दिव्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली लोकल घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ येत असतानाच या लोकलच्या लेडीज डब्यावर ट्रकवरून समाजकंटकांनी दगड भिरकावले. त्यातील प्रचंड वेगाने आलेला एक दगड लेडीज डब्यातील समीक्षा चाळके (25) यांच्या पोटावर आदळला. या फटक्याने समीक्षा वेदनेने कळवळू लागल्या. घाटकोपर स्थानक येताच त्यांना प्रवाशांनी खाली उतरवले. मात्र घाव वर्मी बसल्याने त्या फलाटावरच भोवळ येऊन कोसळल्या. त्यांना जीआरपीने तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर असलेल्या गर्दीने गुदमरून वैशाली भानुशाली (23) ही तरुणीही चक्कर येऊन पडली. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

फलाटावरच महिला बाळंत झाली

मध्य रेल्वेच्या लोकल गोंधळाचा आणि गर्दीचा फटका जस्मीन शेख (29) या गर्भवती महिलेलाही बसला. खडवली येथून ती मुंबईतील कामा रुग्णालयात प्रसूतीसाठी निघाली होती. खचाखच भरलेल्या लोकलमध्ये तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. लोकल डोंबिवली स्थानकात आली तेव्हा त्या लोकलच्या दरवाजावरील प्रवाशांनी चढणार्‍या प्रवाशांना हात जोडून गर्भवती महिला असल्याचे सांगितले. त्यामुळे जस्मीनला कसेबसे फलाटावर उतरवण्यात आले. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी महिला कर्मचार्‍यांना तातडीने घटनास्थळी बोलवले. फलाटावरच आडोसा तयार करण्यात आला आणि या महिला कर्मचार्‍यांनी प्रवासी महिलांच्या मदतीने जस्मीनचे बाळंतपण केले. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून दोघेही सुखरूप आहेत. त्यांना जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आले.