चिखली – नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिखली शहरातील जामवंती नदीच्या पात्रात बुडून चार तरुणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पोहण्यासाठी गेलेली ही चारही तरुण मुले दीड-दोन तासाच्या शोधकार्यानंतर मृतावस्थेत आढळून आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चिखली शहरातील सैलानीनगर भागात राहणारे सैय्यद रिझवान सै. फिरोज, शेख साजिद शेख शफीक, वसिम शाह इरफान शाह आणि शेख तौफिक शेख रफिक ही चारही मुले रविवारी सकाळी पोहण्यासाठी जामवंती नदीकडे गेले. परंतु बराच वेळ झाला तरीही घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नदीपात्राकडे धाव घेतली. या ठिकाणी कोणीही आढळून न आल्याने नदीच्या पात्रात शोधाशोध करण्यात आली. दीड तासानंतर गाळात फसलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत्यूमुखी पडलेले युवक 16 ते 20 वयोगटातील आहे.

मुलांचे मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. घटनास्थळी आणि चिखली ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी सध्या मोठी गर्दी केली आहे. चारही मुलांच्या वयाची माहिती अद्याप मिळालेली नाही. या चारही मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.