अमेरिकेतील सुट्टी ठरली अखेरची, हैदराबादच्या कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेल्या हैदराबादच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले. हैदराबाद येथे राहणारे कुटुंब सुट्टीसाठी अमेरिकेला गेले होते. त्या वेळी ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यानंतर या कारने पेट घेतला आणि या घटनेत आई, वडील, मुलगा आणि मुलगी या चौघांचा मृत्यू झाला.

हैदराबादचे डॉक्टर व्यंकट, त्यांची पत्नी तेजस्विनी तसेच त्यांचा एक मुलगा आणि मुलगी चौघेही अपघातात ठार झाले. कुटुंब डॅलसमध्ये सुट्टीसाठी गेले होते. अटलांटामधील नातेवाईकांना भेटून परतताना ग्रीन काऊंटी भागात सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या कारचा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चुकीच्या दिशेने येत होता. समोरासमोर झालेल्या या धडकेनंतर कारला आग लागली आणि संपूर्ण कुटुंब त्यात होरपळले. आग इतकी भयंकर होती की, चौघांचाही जागीच मृत्यू झाला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. डीएनए चाचणीच्या आधारे मृतांची ओळख पटवून नातेवाईकांना मृतदेह सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.