
नवीन कृषी कायदे व शेतकरी आंदोलनासंबंधी अडेलतट्टू भूमिका मोदी सरकारच्या चांगलीच अंगलट आली आहे. अकाली दलपाठोपाठ राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने (आरएलपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) साथ सोडली आहे.
गेल्या चार महिन्यांत भाजपची साथ सोडणारा आरएलपी हा चौथा पक्ष आहे. एकापाठोपाठ एक मित्रपक्ष साथ सोडून जाऊ लागल्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
आरएलपी हा भाजपचा राजस्थानातील मित्रपक्ष आहे. शेतकऱयांविरोधात जाणाऱयांना पाठिंबा देणार नाही, असा सडेतोड पवित्रा घेत आरएलपीचे राष्ट्रीय संयोजक हनुमान बेनीवाल यांनी शनिवारी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये भाजपचा सर्वात जुना साथीदार राहिलेल्या शिरोमणी अकाली दलने एनडीएला रामराम ठोकला होता. त्यानंतर मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या हरसिमरत कौर यांनी शेतकऱयांच्याच मुद्दय़ांवर राजीनामा दिला होता. ऑक्टोबरमध्ये पी. सी. थॉमस यांच्या केरळ काँग्रेसने तसेच डिसेंबरच्या सुरुवातीला आसाममध्ये बोडोलॅण्ड पीपुल्स प्रंटने एनडीएची साथ सोडली.
एनडीएमध्ये आता उरले फक्त 16 पक्ष
एनडीएमध्ये आता केवळ 16 घटक पक्ष राहिले आहेत. यातील काही पक्ष अलीकडेच एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यात बिहारच्या जीतनराम मांझींचा हम, मुकेश साहनींचा व्हीआयपी हे पक्ष आहेत. याप्रमाणेच आसाममध्ये प्रमोद बोरो यांच्या युनायटेड पीपल्स पार्टीने बीटीसी निवडणुकीनंतर भाजपसोबत युती केली आहे.
2014 नंतर एनडीएला अशी लागली पक्षगळती
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा विजयानंतर सर्वप्रथम हरयाणा जनहित काँग्रेसने भाजपला झटका दिला.
- लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच पुलदीप विष्णोई यांनी एनडीएला अलविदा म्हटले.
- तामीळनाडूतील एमडीएमकेने भाजपवर तमीळ लोकांविरुद्ध काम केल्याचा ठपका ठेवून एनडीएतून काढता पाय घेतला. आंध्रात जनसेनेने भाजपला धक्का दिला.
- 2016 मध्ये तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी डीएमडीके आणि पीएमके या दोन पक्षांनी भाजपचा हात सोडला. याच वर्षात रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पार्टीनेही भाजपची साथ सोडली.
- 2017 मध्ये महाराष्ट्रातील स्वाभिमान पक्षाने मोदी सरकार शेतकऱयांच्या विरोधात असल्याचा आरोप केला व एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.




























































