मतदार यंत्रातील डाटा क्लिअर केल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

जिल्ह्यातील डोणगाव येथील 120 मतदार केंद्रावर 18 एप्रिल रोजी मतदाना दरम्यान मतदान मशीन मधून डाटा क्लिअर केल्यामुळे फेरमतदान घेण्याची पाळी प्रशासनावर आली. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी त्या मतदार केंद्रावर असलेल्या चार कर्मचार्‍यांना आज तडकाफडकी निलंबित करुन त्यांची चौकशी सुरु केली आहे.

जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील क्र. 120 मतदार केंद्रावर 18 एप्रिल रोजी मतदान पथकाकडून मॉक पोल केल्यानंतर कंट्रोल युनिट मधील डाटा क्लीअर न केल्याने व काही मतदान झाल्यावर डाटा क्लिअर केल्याने प्रशासनाला पुन्हा मतदान घेण्याची वेळ आली आहे. तसे आदेशच प्रशासनाने काढले असून 24 एप्रिल रोजी पुन्हा डोणगाव येथील क्र.120 मतदान केंद्रावर मतदान होत आहे.

मतदान पथकाकडून झालेल्या या अक्षम्य दिरंगाईमुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या मतदान केंद्रावर मतदान पथकात असलेल्या कर्मचारी नंदकिशोर सखाराम लाघे (सहायक शिक्षक कोठारी हायस्कूल नांदुरा), ए.पी. अमलकार (कनिष्ठ लिपीक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव), किशोर माधवराव देशमाने (कनिष्ठ लिपीक, तक्षशिला हायस्कूल चिखली) व अब्दुल नईम शेख अब्दुल (सहायक शिक्षक, जि.प. शाळा नांद्राकोळी, ता. बुलढाणा) या चौघांना तडकाफडकी निलंबित करुन या कर्मचार्‍यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.