ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कुत्र्याच्या चार पिलांचा मृत्यू, कसारा रेल्वे यार्डातील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसारा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 जवळ असलेल्या सायडिंग यार्डात रेल्वेच्या ठेकेदार कंपनीने कुत्र्याच्या चार पिलांचा बळी घेतला आहे. मोकळ्या जागेत बसलेल्या कुत्र्याच्या पाच पिलांकडे दुर्लक्ष करून या ठेकेदाराने रेल्वेचे महाकाय स्लीपर्स ठेवले. या स्लीपर्सखाली पाच पिले अडकली. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. मात्र त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते व प्रवाशांना रेल्वेच्या स्टेशन मॅनेजरने अत्यंत उद्धट उत्तरे दिली. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

कसारा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी ठेकेदार कंपनीने स्लीपर्स मागवले आहेत. हे स्लीपर्स ज्या ठिकाणी उतरवण्यात येत होते तिथे कुत्र्याची पाच पिले बसली होती. मात्र ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत स्लीपर्स उतरवले. त्याखाली कुत्र्याची ही पिले अडकली. आपला जीव वाचवण्यासाठी ती सातत्याने ओरडत होती व बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र स्लीपर्सखाली दबल्याने त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले.

तुम्ही चमच्याने दूध पाजा

ही बातमी कळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी या पिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु स्लीपर्स हटवल्याशिवाय ही पिले बाहेर पडणार नाहीत हे कळल्यावर त्यांनी कसारा रेल्वे स्थानकाच्या स्टेशनमास्तर कार्यालयाशी संपर्क साधला. नवजात पिले आहेत, बाहेर असलेली कुत्री त्यांना दूध पाजू शकत नाही, दुधाअभावी त्यांचा मृत्यू होईल असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. ‘तुम्हाला पिलांचा इतकाच पुळका असेल तर त्यांना चमच्याने दूध पाजा’ अशी उद्धट उत्तरे कर्मचाऱ्यांनी दिली. अखेर दोन पिलांचा मृत्यू झाला आणि उर्वरित तीन पिलांना वाचवण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. आपत्ती व्यवस्थापन टीमने रात्री उशिरापर्यंत मेहनत करून ते महाकाय स्लीपर्स हटवले, परंतु त्याखाली दबल्याने तीनपैकी दोन पिलांचा मृत्यू झाला. एक पिल्लू मात्र सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.