साडेचार हजार किलो मांगूर माशांची विल्हेवाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मांगूर माशांवर बंदी घालूनही या माशांचा साठा केला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खालापूर तालुक्यामध्ये हे मासे असल्याचे समजताच धाड टाकून ते जप्त करण्यात आले. तब्बल 4 हजार 550 किलो माशांचा साठा जप्त करून तो नष्ट केला आहे. दरम्यान मत्स्य विभागाने हा साठा नष्ट केला असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने मांगूर प्रजातीचे मासे नष्ट करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. या आदेशानुसार अलिबागच्या मत्स्य अधिकारी व कर्मचाऱयांनी खालापूर तालुक्यातील महड येथील तलावात साठवलेला तीन हजार किलोचा मांगूर माशांचा साठा जप्त करून तो एका खड्डय़ात गाडून टाकण्यात आला. तसेच माजगाव येथेही छापा टाकून सुमारे दीड हजाराचा माशांचा साठा नष्ट केला असून संबंधित विक्रेत्यांना समज देऊन नोटीस बजावली आहे.
मांगूर माशांच्या विरोधात मत्स्य विभागाने मोहीम उघडली असून जिथे अशा प्रकारचे मासे आढळून येतील तिथे छापेमारी सुरू करण्यात आली आहे. पनवेल, कामोठे, खारघर, तळोजे येथील मासळी विक्री केंद्रांना अधिकाऱयांनी भेटी दिल्या असून आठ विक्रेते मांगूर मासे विकत असल्याची माहिती मिळाली. या विक्रेत्यांना सक्त ताकीद दिली असून पुन्हा विक्री केल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.