
मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ कफ सिरप या खोकल्याच्या औषधामुळे 14 छोट्या मुलांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व चिमुरडे हे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील आहेत. यामध्ये उसैद नावाच्या चिमुरड्याचाही मृत्यू झाला आहे. तो अवघ्या 3 वर्षे 11 महिन्यांचा होता. त्याचे वडील रिक्षाचालक होते. रिक्षा चालवून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, परंतु मुलाच्या उपचारासाठी त्यांनी जवळचे सर्व काही विकले. इतकेच काय तर ज्या रिक्षावर कुटुंबाचे घर चालत होते, तो रिक्षाही विकून टाकला. परंतु तरीही मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले नाही.
रिक्षाचालक यासीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलगा उसैदच्या उपचारासाठी त्यांनी साडेतीन लाख रुपये खर्च केले. मुलाचे डायलिसिस करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला रिक्षा विकला. मुलगा गेल्याने त्याची आई आणि आजी या दोघींनाही प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. उसैदचा 10 ऑक्टोबरला वाढदिवस होता. यंदाचा वाढदिवस चांगला साजरा करू असे त्याच्या आई-वडिलांनी ठरवले होते, परंतु वाढदिवसाच्या पाच ते सहा दिवस आधीच मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उधार पैसे घेऊन उपचार
अदनान या पाच वर्षीय मुलाचाही कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायल्याने मृत्यू झाला आहे. त्याचे वडील अमन यांना मोठा धक्का बसला आहे. ग्राहक सेवा केंद्र चालवणाऱ्या अमीन यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून उसणे पैसे घेतले होते. डॉ. प्रवीण सोनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अमन यांनी केली आहे.