
भांडणाचा राग मनात धरून एका तरूणावर कोयत्याने वार करत दुसऱ्याला दगडाने मारहाण करणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणेएकच्या सुमारास ताडीवाला रस्ता परिसरात घडली.
अजय उर्फ ढार उर्फ सत्तर काळूराम साळुंखे (वय 20), गणेश उर्फ मॉम नरसिंग बंगारे (वय 20) आकाश उर्फ गोट्याभाई जिंदाली म्हेत्रे (वय 20), सूरज उर्फ चाऱ्या विक्रम मोरे (वय 23, सर्व रा. ताडीवाला रस्ता ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय सातपुते (वय 28) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा मित्र समी पात्रे याच्याशी अजय उर्फ सत्तर याची भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनामध्ये धरून चौघांनी अक्षयच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने वार करून जखमी केले. त्याशिवाय आकाश पुजारी याला दगडाने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.


























































