चौथ्या मराठी विश्व संमेलनाचा फार्स 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकतेच नाशिक येथे मराठी विश्व संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे हे चौथे वर्ष. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ या महत्त्वाच्या विभागांनी संयुक्तपणे या संमेलनाचे आयोजन केले  होते. जानेवारी महिन्यात 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. तुलना करता या विश्व संमेलनाचे आयोजन चोख होते. शासनाची मुख्य जबाबदारी असल्याने आयोजनात कसर राहणे शक्य नाही परंतु यात रसिक प्रेक्षक आणि मुख्यत साहित्यिकांची वानवा मात्र जाणवली. के.टी.एच.एम. महाविद्यालय, कालिदास सभागृह अशा ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परंतु खुद्द नाशिककरांनाही आपल्या शहरात असे संमेलन पार पडत आहे याचा सुगावा लागला नाही. शासन दरबारी होणारी खातिरदारी अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या शहरांतून आलेले सेलिब्रिटी लेखक, कवी यांचा भरणा असणारे हे संमेलन महाराष्ट्रातील तळागाळातील लेखक, प्रकाशक, वाचक यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही हेच या संमेलनाचे ‘यश’ शासनाला अपेक्षित असावे का? हा प्रश्न उरतो.शासनाला केवळ फार्स आणि ‘करून दाखवलं’ या धर्तीवर संमेलन करायचे असेल तर किमान ‘विश्व’ या शब्दाला तरी गाळायला हवे होते.