आषाढीला पूजेत वाचवणार 40 मिनिटे; दोन हजार वारकऱ्यांना मिळणार दर्शन

सुनील उंबरे । पंढरपूर

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना यंदाची वारी अधिक सुखकर होणार आहे. या वर्षीपासून पहाटेच्या पाद्य आणि नित्यपूजेतील 40 मिनिटे कमी करून हा वेळ पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना देण्यात येणार आहे. या अतिरिक्त वेळेमुळे दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या सुमारे दोन हजार भाविकांना विठूमाऊलीच्या दर्शनाचा फायदा होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दैनिक ‘सामना’ला दिली.

आषाढी एकादशीच्या पर्वणीवर श्री विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंधरा लाखांहून अधिक वारकरी भाविक पंढरीत दाखल होतात. मात्र, या लाखो भाविकांपैकी फक्त 60 ते 65 हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन होते. त्यामुळे या दिवसाच्या प्रत्येक सेकंदाला महत्व आहे, हे ओळखून ढोले यांनी आषाढी एकादशीला होणारी पाद्यपूजा आणि नित्यपूजा यातील 40 मिनिटांचा वेळ वाचवून तो भाविकांना दर्शनासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकादशीला रात्री 12 ते 12.45 यावेळेत श्री विठ्ठल रखुमाईची पाद्यपूजा केली जाते. एकच यजमान दोन्ही पूजा करीत असल्याने यासाठी अधिकचा वेळ लागत असल्याचे निदर्शनास आल्याने यावर्षी प्रथमच दोन्ही देवतांकडे दोन यजमान बसवून एकावेळी या पूजा विधिवत केल्या जाणार आहेत. या एकत्रित पुजेमुळे वीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे. याच पद्धतीने नित्यपूजा करण्यात येणार असल्याने या पूजेतीलही 20 मिनिटे वाचणार आहेत. दोन्ही पूजेतील वाचलेली 40 मिनिटे पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी देण्यात येणार आहेत. मंदिर समितीच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे दर्शन रांगेत अनेक तास तिष्ठत उभ्या राहणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे. तसेच दोन हजारहून अधिक भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या