मालवणात एसटी प्रवाशाचे ४० हजार लंपास

34

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण एसटी आगरातून देवबाग येथे जाण्यासाठी मिनीबस मध्ये चढत असताना फ्रान्सिस लोरेस गिरकर (वय ८१ रा. देवबाग राऊळवाडी) यांच्या कडील ४० हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत गिरकर यांनी मालवण पोलिस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देवबाग राऊळवाडी येथील फ्रान्सिस लोरेस गिरकर हे सेवानिवृत्त नायब सुभेदार आहेत. त्यांना पेन्शन लागू असून मालवण येथील एका बँकेत त्यांच्या खात्यावर जमा झालेली पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गिरकर हे सकाळी मालवणात आले होते. ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी बँकेतून ४० हजार रोख रक्कम काढून आपल्याकडील एका काळ्या रंगाच्या पर्स मध्ये ठेवून ती पर्स कापडी पिशवीत ठेवली. बँकेतील काम आटोपल्यावर ते मालवण एसटी स्टँड येथे मालवण- देवबाग गाडी साठी थांबले होते. गाडीला उशीर झाल्याने ते बराच काळ एसटी स्टँड परिसरात बसून होते.

साडे बारा वाजण्याच्या सुमारास मालवण देवबाग मिनीबस लागल्यावर त्या बसमध्ये चढण्यास प्रवाशांची एकच गर्दी झाली. याच गर्दीतून फ्रान्सिस गिरकर हे बसमध्ये चढत असताना त्यांच्या मागे असणाऱ्या दोघा महिलांनी ढकलाढकल केली. या गर्दीतून गिरकर हे बस मध्ये चढल्यावर सीट वर बसले असता तिकिटासाठी पैसे काढण्यासाठी त्यांनी आपल्याकडील कापडी पिशवीत हात घातला असता त्यांना रोख रक्कम ठेवलेली काळी पर्स त्यात सापडून नाही. तसेच बस मध्ये चढतेवेळी ढकलाढकल करणाऱ्या त्या दोन महिला देखील बस मध्ये दिसून आल्या नाहीत. आपल्याकडील रोख रक्कमेची पर्स चोरीला गेली आहे हे समजल्यावर त्यांनी मालवण पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यामुळे सदर मिनीबस पोलिस स्थानक आवारात आणून तपासणीही करण्यात आली. मात्र ती रोख रक्कम सापडून आली नाही. याबाबत गिरकर यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस रेश्मा मोमीन, निलेश सोनावणे, गलोले हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या