झाकीर नाईकची चिथावणीखोर पोस्ट; फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात ओकली गरळ

इस्लामबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांच्याविरोधात काही देशात निदर्शे करण्यात येत आहेत. या विरोध प्रदर्शनाची बाजू घेत वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकने चिथावणीखोर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात गरळ ओकली आहे. तसेच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही दिला आहे.

झाकीर नाईक फ्रान्सच्या राष्ट्रपतीविरोधात प्रक्षोभक पोस्ट टाकत आहे. याआधी त्याने फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मिडीयावर केले होते. आता त्याने आणखी एक चिथावणीखोर पोस्ट शेअर केली आहे. ”… अल्लाच्या दूतांना शिव्या देणाऱ्यांना याची शिक्षा भोगावी लागेल, याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल,” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टद्वारे तो तरुणांना फ्रान्सविरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याच्या प्रक्षोभक विचारांचा प्रसार करत असल्याचा आरोप होत आहे. हिंदुस्थानातील काही लोकांनाही त्याने चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या विचारांच्या प्रभावाने घातपाती कारवाया घडल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे.

या घटनेने वादाला सुरूवात
फ्रान्समध्ये एका शिक्षकाने वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मोहम्मद पैंगबर यांचे वादग्रस्त कार्टून दाखवले होते. त्यानंतर एका विद्यार्थ्याने त्या शिक्षकाची हत्या केली. याघटनेचा उल्लेख फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों दहशतवादी घटना असा केला होता. तसेच इस्लामकडून होणारे हल्ले खपवून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

मोहम्मद पैंगबर यांचे वादग्रस्त कार्टून कायम ठेवण्याचा निर्णयही इमॅन्युएल मॅक्रों यांनी घेतला होता. तसेच इस्लामबाबत वादग्र्सत वक्तव्य केले. त्यांच्या या निर्णयाला अनेक मुस्लीम देशांनी विरोध दर्शवला. तुर्कस्थान, सौदी अरब, कतार, जॉर्डन, पाकिस्तान आणि बांग्लादेशसह अनेक देशात मॅक्रों यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार करण्यात आला. आता झाकीर नाईकने मॅक्रों यांच्याविरोधात गरळ ओकली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या