
सामना ऑनलाईन । सेंट पिट
जबरदस्त बचाव… गोलरक्षक ह्युगो लॉरिसची अभेद्य कामगिरी… उत्तरार्धातील धारदार आक्रमण… आणि शेवटपर्यंत राखलेला समन्वय अशा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फ्रान्सने फिफा वर्ल्ड कपमधील बेल्जियमचा विजयरथ रोखला. या विजयासह फ्रान्सने २० वर्षांत तिसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्ड कपची फायनल गाठण्याचा पराक्रम केला. लढतीतील एकमेव गोल बचावपटू सॅम्युएल उमटिटी याने केला.
सेंट पिटर्सबर्गच्या मैदानावर रंगलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत पहिल्या मिनिटापासून तुल्यबळ खेळ बघायला मिळाला. बेल्जियमने आक्रमक होत सतत हल्ले चढकले, मात्र त्यांचे खेळाडू फ्रान्सच्या बचावफळीला भेदू शकले नाहीत. बेल्जियमचे आक्रमण विरुद्ध फ्रान्सचा बचाव असे सुरुवातीचे चित्र होते. सामन्याचा पूर्वार्ध हा गोलशून्य बरोबरीत सुटला. सामन्याच्या तिसऱ्या आणि १३ व्या मिनिटाला फ्रान्सला गोलची संधी मिळाली, पण चेंडूची दिशा भरकटल्याने गोल होऊ शकला नाही. सामन्याच्या १९व्या मिनिटाला बेल्जियमकडून पहिला प्रयत्न झाला, पण फ्रान्सच्या बचावपटूने तो प्रयत्न हाणून पाडला. पाठोपाठ लगेचच २१ व्या मिनिटाला बेल्जियमने कॉर्नर किकला दिशा देत जोरदार आक्रमण केले, पण फ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक ह्युगो लॉरिस याने अफलातून उडी घेत हा गोल रोखला. त्यानंतर ३९ व्या मिनिटाला फ्रान्सने केलेले आक्रमण बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कॉर्टोईसने रोखले. त्यामुळे पूर्वार्धात दोनही संघांना एकही गोल करता आला नाही. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या गेल्या १२ सामन्यांपैकी ९ सामने हे पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत सुटले होते.
उत्तरार्धात मात्र फ्रान्सने आक्रमक खेळावर भर दिला. त्याचे फळ त्यांना लगेचच मिळाले. ५१ व्या मिनिटाला फ्रान्सकडून बचावपटू सॅम्युअल उमटिटीने हेडरच्या माध्यमातून गोल केला. कॉर्नरवरून आलेल्या चेंडूला त्याने योग्य दिशा दिली. ग्रीझमनने या गोलमध्ये सहाय्यक खेळाडूची भूमिका पार पाडली.उमटिटीचा हा कारकीर्दीतील तिसरा गोल ठरला. त्याचा हा अप्रतिम हेडर बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कॉर्टोइसला कळलाही नाही. त्यानंतर आक्रमक खेळ करण्याच्या नादात बेल्जियमला दोन पिवळी कार्ड दाखविण्यात आली. १-० अशी आघाडी घेतल्यानंतर फ्रान्सने आक्रमणाची धार कमी करून बचावावर अधिक भर दिला. सामन्यांच्या निर्धारित वेळेनंतर सहा मिनिटांच्या भरपाई वेळेतही बेल्जियमने गोल करण्यासाठी जिवाचे रान केले, पण अखेरची शिट्टी वाजली अन् बेल्जियमच्या स्वप्नाचा चुराडा झाला.
गेल्या 20 वर्षांत…
फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात गेल्या २० वर्षांत सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत धडक मारणारा देश म्हणून फ्रान्सच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला. १९९८ मध्ये पहिल्यांदा फ्रान्सने फुटबॉल वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर २००६ मध्येही फ्रान्सने हा पराक्रम केला. मग आता तब्बल १२ वर्षांनंतर यंदा २०१८ च्या वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सने बेल्जियमला १-० गोलफरकाने हरवून तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिली. १९९८ मध्ये झालेल्या फिफाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने ब्राझीलचा ३-० असा पराभव करीत पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले होते. २००६ च्या किताबी लढतीत त्यांचा इटलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ ने पराभव झाला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या उंपात्य फेरीतील विजयानंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
वर्ल्ड कपमध्ये फ्रान्स व बेल्जियम यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तीनही सामन्यांत फ्रान्सनेच बाजी मारली. यापूर्वी 1938 मध्ये फ्रान्सने सामना ३-१ ने जिंकला होता. त्यानंतर १९८६ मध्ये प्ले ऑफच्या लतीत फ्रान्सने बेल्जियमला ४-२ गोलफरकाने नमविले होते. याबरोबरच यंदाच्या पराभवाने बेल्जियमची २४ सामन्यांतील विजयी घोडदौड रोखली केली.
आकडेवारी
फ्रान्स बेल्जियम
गोल १ ०
कॉर्नर्स ४ ५
ऑफसाइड १ १
बॉल ताबा ४० ६०
पासेस ३४२ ६२९
यलो कार्ड २ ३



























































