दापोलीतील व्यापाऱ्याची 30 लाख 75 हजार रूपयांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका महिलेने 93 लाख रूपये किंमतीचे पाऊंड कुरियरने पाठवले आहेत ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 30 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली असून या प्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालगाव येथील विजय प्रभाकर खोत यांची जानेवारी 2020मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. फेब्रुवारीमध्ये या महिलेने खोत यांच्या व्हाट्सअपवर एक पार्सल पाठविले आहे असा मेसेज केला. पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हाट्सअपवर टाकले. त्यानंतर प्रिया शेठ या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे, त्यात फोटोत दाखविलेल्या वस्तू व 93 लाख रुपये किंमतीचे पाऊंड आहेत, असे सांगितले. त्यांनी यासंदर्भात कस्टम व रिझर्व्ह बँक या शासकीय आस्थापना यांची प्रमाणपत्रेही पाठविली होती.

ही कागदपत्रे खरी असतील हे गृहीत धरून खोत यांनी त्यांच्याकडे मागणी केली जात होती तसे बँकेत पैसे भरले. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने खोत याना दोन एटीएम कार्डही पाठवली. या एटीएमद्वारे खोत यांनी 2 वेळा पैसेही काढले. या सर्व प्रकारात खोत यांनी तब्बल 30 लाख 73 हजार 100 रुपये या व्यक्तींनी पाठविलेल्या ई-मेलमध्ये दिलेल्या बँक खात्यात भरणा केले.

पैसे भरल्यानंतर देखील खोत यांना कुरियर काही आले नाही. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे विजय खोत यांचे लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाणे गाठून अमेलिया जॅक्सन, प्रिया शेठ, पूजा शर्मा यांच्याविरोधात प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

प्रलोभनाला बळी पडू नका!

फेसबुक हॉटस्अॅप अशा सोशल मीडियातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. या लोकांच्या प्रलोभनाला आकर्षित होऊन अनेक व्यक्ती त्यांनी आयुष्यभराची जमवलेली पुंजी पणाला लावत असून त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मोठा धक्का बसत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.