स्वामी समर्थ, साईबाबा अंगात येतात अशी बतावणी करून 4 कोटींचा गंडा, भोंदूबाबा फडणीससह तिघांना अटक

6285

स्वामी समर्थ आणि साईबाबांचा अंगात संचार होऊन ते आज्ञा देतात अशी भीती घालून भाविकांना सुमारे चार कोटीला लुबाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संदीप नंदगांवकर यांनी फिर्याद दाखल केली असून प्रविण विजय फडणीस (44, रा. मंगळवार पेठ), त्याचा गुरू श्रीधर नारायण सहस्त्रबुध्दे (55, रा. फुलेवाडी), त्यांची साथीदार सविता अनिल अष्टेकर (रा.मंगळवार पेठ) या तिघा भोंदुंना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा फडणीस व सहस्रबुद्धे यांच्या मंगळवार पेठेतील मठात नंदगांवकर, त्याची पत्नी व भाऊ दर्शनासाठी जात होते. भोंदूबाबा फडणीस यांनी सांगितल्याने ते नियमितपणे येऊ लागल्याने नंदगावकर व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास त्याने संपादन केला. सन 2013 ते 29 मे 20202 पर्यंत फडणीस, त्याचा गुरु श्रीधर सहस्त्रबुध्दे आणि साथीदार सविता अष्टेकर हिच्या मदतीने फडणीस यांच्या अंगात स्वामींचा संचार होऊन ताकद येत असल्याचे आणि श्रीधर सहस्त्रबुध्दे यांच्यात साईबाबांचा संचार होवुन त्यांच्या मुखातून साईबाबाच बोलत असल्याचे भासविले.

नंदगांवकर आणि त्यांच्या पत्नीकडुन फ्लॅट, मठ व कसबा तारळे (ता.राधानगरी) येथील गोशाळेसाठी वेळोवळी 35 लाख रुपये इतकी रोख रक्कम घेतली. फिर्यादीने भाऊ प्रविण नंदगावकर यांचेकडुन ही मोठी रक्कम घेतल्याचे तसेच ओंकार किशोर बाजी, मंदार शिरीष दिक्षीत, रेणुका अरविंद चिंगरे,श्रीमती विद्या गिरीष दिक्षीत,।केदार शिरीष दिक्षीत, रुपा किशोर बाजी,श्रीमती दिपा नारायण बाजी, शहाजी हिन्दुराव पाटील, गोविंद लक्ष्मण जोशी, मिनाक्षी मिलींद करी, एकता जयंत जोशी, जयंत मानव जोशी या भक्तांचीही अशाच प्रकारे अर्थिक फसवणुक करुन या सर्वांना 3 कोटी 96 लाख इतक्या मोठ्या रक्कमेची फसवणूक करून लुबाडले असल्याचे नंदगावकरांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काल मध्यरात्रीच पोलिसांनी कारवाई करत या तिघा भोंदूबाबांना अटक केली. आज शुक्रवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पाटील करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या