
शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, या गैरव्यवहारामुळे पुरवठा शाखेतील सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. गेल्या चार महिन्यांत आनंदाचा शिधा तालुक्यातील रेशन दुकानदारांना देण्यात आला होता. हा शिधा विकल्यानंतर त्याचे पैसे आम्ही पुरवठा शाखेतील अधिकाऱयांच्या सूचनेनुसार या विभागात काम करणाऱया तरुणाकडे दिले. मात्र, त्याने ही रक्कम शासकीय कोषागारात भरलीच नसल्याचा आरोप करत रेशन दुकानदारांनी ही रक्कम भरण्यास नकार दिला, तर दुसरीकडे ही रक्कम जमा करा, असे आदेश महसूल प्रशासनाने रेशन दुकानदारांना दिल्याने पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाथर्डी तालुक्यात एकूण 164 रेशन दुकानदार असून, दीपावली, पाडवा व गणपती उत्सवकाळात या सर्व रेशन दुकानदारांना पुरवठा शाखेने ‘आनंदाच्या शिध्या’चे वाटप केले होते. तीन टप्प्यांत दिलेल्या या शिध्याची रक्कम जवळपास 50 लाख रुपयांच्या आसपास असून, हा शिधा विकल्यानंतर त्याची रक्कम रेशन दुकानदारांनी शासकीय कोषागारात भरणे क्रमप्राप्त आहे.
दुकानदारांच्या म्हणण्यानुसार पुरवठा शाखेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका तरुणाकडे ही रक्कम जमा करावी, असे तोंडी आदेश आम्हाला पुरवठा शाखेतील अधिकाऱयाने दिले होते. आम्ही शिधा विक्रीतून आलेली रक्कम या तरुणाकडे जमा केलेली असल्याने आम्ही आता परत पैसे भरणार नाही, असा पवित्रा दुकानदारांनी घेतला आह़े तर दुसरीकडे महसूल प्रशासनाने रेशन दुकानदारांनी ही रक्कम तातडीने शासनाच्या खात्यात भरावी, असे तोंडी आदेश दिले आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या विषयावर पुरवठा शाखेत उलटसुलट चर्चा चालू आहे. या विषयावर सर्व रेशन दुकानदारांनी बैठक घेत आम्ही आमचे पैसे जमा केले असल्याने हे पैसे भरणार नसल्याचा पवित्रा घेतला तर दोन दिवसांपूर्वी तहसीलदार शाम वाडकर यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करत ज्यांच्याकडे शिध्याची थकीत बाकी आहे, ती त्यांनी जमा करावी, असे आदेश रेशन दुकानदारांना दिले आहेत.
तीन टप्प्यांत हा शिधा दुकानदारांना देण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात दिलेल्या मालाचे पैसे पूर्ण जमा झाले की नाही हे न पाहताच पुरवठा शाखेने दुसऱया व तिसऱया टप्प्यात कसा माल दुकानदारांना दिला, हे समजू शकत नाही, तर दुसरीकडे रेशन दुकानदारांनी विकलेल्या मालाचे पैसे शासकीय कोषागारात भरणे बंधनकारक असताना, तरुणाकडे पैसे का जमा केले, असाही प्रश्न निर्माण झाला असून, आता रेशन दुकानदार हे पैसे भरणार की नाही ? व न भरल्यास महसूल खाते काय कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात पुरवठा अधिकारी ज्योती अकोलकर व पुरवठा विभागात या विभागाशी संबंधित अधिकारी संदीप बडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पुरवठा शाखेत कोणीही खासगी व्यक्ती काम करत नाही. रेशन दुकानदारांनी परस्पर कोणाकडे पैसे दिले असतील तर त्यांनी भरणा केलेले चलन ताब्यात घ्यायला हवे होते. ज्यांच्याकडे पैसे येणे बाकी आहे, त्यांच्याशी आपण चर्चा केली असून, येत्या 15 दिवसांत पैसे भरू, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे. त्यांची कोणी फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.
– श्याम वाडकर, तहसीलदार.
पुरवठा शाखेत आठ वर्षांपासून काम करणाऱया तरुणाकडे पैसे द्या, असे पुरवठा शाखेतील अधिकाऱयांनी सांगितल्याने आम्ही त्याच्याकडे पैसे दिले. मी स्वतः ‘फोन पे’ वरून दीड लाख रुपये दिले असून, त्याने जर पैसे भरले नसतील तर आमचा काय दोष आहे. हा मोठा घोटाळा असून, वेळ पडल्यास गुन्हा दाखल करू.
– रवींद्र ऊर्फ पिनू मुळे, रेशन दुकानदार, शिराळ























































