मदतीच्या बहाण्याने वृद्धेची मालमत्ता हडपली; माणुसकीआडून फसवणुकीचे कारस्थान

माणुसकी दाखवत कुठलीही लालसा न ठेवता अनेक जण इतरांच्या मदतीला जातात. कुर्ल्यातील एक कुटुंबदेखील शेजारच्या वृद्ध काकूच्या मदतीला धावले. मागेपुढे कोणी नसल्याने तेच तिचा सांभाळ करू लागले. तिला जेऊ-खाऊ घालू लागले. पण हे सर्व करताना शेजारच्यांचा वृद्धेच्या मालमत्तेवर डोळा होता. अखेर त्यांनी माणुसकीच्या आडून महिलेची प्रॉपर्टी हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.

कुर्ला पूर्वेकडील जागृती नगरातल्या कालेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीत जयश्री या 77 वर्षीय वृद्धा एकटय़ाच राहतात. अविवाहित त्यात नातेवाईक त्यांच्या संपर्कात नव्हते. वयोवृद्ध झाल्याने त्या घराबाहेर पडत नव्हत्या. त्यातच त्यांना स्मृतीभंश झाला. शिवाय दोन्ही डोळ्यांची दृष्टी अंधूक झाली. शेजारी राहणारे सोंळखी व अन्य जयश्री यांच्या मदतीला धावले. त्यांनी जयश्री यांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचे इतके घट्ट संबंध निर्माण झाले की शेजारी बोलतील तीच जयश्री यांची पूर्व दिशा ठरू लागली. याचा गैरफायदा उचलत सोळंकी व अन्य तिघांनी जयश्री यांच्या दोन सदनिका, एक गाळा विकून ते पैसे हडप केले. जयश्री यांचे सोन्याचे दागिनेदेखील चोरले. हा प्रकार जयश्री यांच्या मावस बहिणीला समजताच त्यांनी नेहरू नगर पोलिसांत धाव घेतली.

तपासात माणुसकीचा पडदा फाटला

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक शाहीन देसाई यांनी या प्रकरणाचा तपास केला असता कादीर सोंळकी, अकबर सौदागर, जलालुद्दीन शेख, यश भंडारे यांनी मिळून जयश्री यांची मालमत्ता हडप केल्याचे समोर आले. या अन्य आरोपींनी मिळून तब्बल दोन कोटी 26 लाख 87 हजार रुपये लुबाडल्याचे समोर आले. त्यामुळे या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.