प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणारा गजाआड; हॉटेलमध्ये बसून घ्यायचा इंटरव्हय़ू

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱया ठगाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. आनंद कुमार राम असे त्याचे नाव आहे. फसवणुकीतील 15 टक्के रक्कम त्याला मिळत होती. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.

कांदिवली येथे एक महिला शिक्षिका राहतात. त्याच्या मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्याने गेल्या वर्षी सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीखाली असलेल्या लिंकवर त्याने माहिती भरली. माहिती भरल्यावर त्यांना ठगाने फोन केला. कोणत्या विद्यापीठातून आणि कोणत्या शाखेतून शिक्षण करायचे याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर आनंदने शिक्षिकेच्या मुलीचा ऑनलाईन इंटरव्हय़ू घेतला. इंटरव्हय़ू घेतल्यावर त्यांना बनावट ऑफर लेटर पाठवले. तसेच मुलीला त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला असे भासवले. प्रवेशाच्या नावाखाली महिलेकडून त्याने 22 लाख रुपये उकळले. पैसे भरल्यावर शिक्षकेने एका महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. महिलेच्या तक्रारीवरून उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्यानंतर कोलकाता येथील हॉटेलमधून पोलिसांनी आनंद कुमारला ताब्यात घेऊन अटक केली.

नुकसान भरून काढण्यासाठी करत होता फसवणूक
आनंदकुमार हा मूळचा धनबादचा रहिवाशी असून तो पदव्युत्तर आहे. कोविड काळात त्याने क्रिप्टो स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती. त्यात त्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. नुकसान भरून काढण्यासाठी तो ठगांच्या माध्यमातून फसवणूक करत होता.

15 टक्के रक्कम
आनंदकुमार हा हॉटेलमधून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन इंटरव्हय़ू घेत असायचा. फसवणुकीच्या रकमेतून त्याला 15 टक्के रक्कम मिळायची. ती रक्कम त्याला रोख स्वरूपात मिळत होती. त्याने कोलकाता येथे भाडय़ाने रूम घेतला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो हॉटेलमध्ये राहत होता.