
मुंबईत गणेशोत्सवाच्या धर्तीवर पालिकेकडून नवरात्रोत्सव आणि छटपूजेसाठी विनाशुल्क परवानग्या देण्यात येणार आहेत. फक्त 100 रुपये अनामत शुल्क आकारण्यात येणार आहे. तर उत्सवांच्या नियोजनाची जबाबदारी पालिका, पोलिसांकडून पार पाडली जाणार आहे. नवरात्रोत्सवासाठी लागणाऱया सर्व परवानग्या ‘एक खिडकी’ योजनेमार्फत देणार येणार आहे.
मुंबईत 1200 हून अधिक नवरात्रोत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरीत्या उत्सवासाठी परवानगी घेतात. तसेच मुंबई शहरात 82 हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. दुर्गामूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, दिवे, शौचालय, निर्माल्य कलश इ. व्यवस्था. छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलाव, निर्माल्य कलश, महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था पालिकेतर्फे करण्यात येणार आहे.
उपनगरातील मंडळांना मिळणार घरगुती दराने वीज
उपनगरातील नवरात्रोत्सव मंडळांना आता घरगुती दराने वीज पुरवठा होणार आहे. सदरचा दर वाणिज्यक वीज दराच्या तुलनेत कमी असल्याने आर्थिक चणचणीचा सामना करणाऱया मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरकडून वीज पुरवठा केला जातो. सण-उत्सवाच्या काळातही वेगवेगळय़ा सार्वजनिक मंडळांना वीज पुरवठा केला जातो. सदरचा विजेचा दर जास्त असल्याने मंडळांवर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे नवरात्रोत्सवात मंडळांना कमी दराने वीज पुरवठा करण्याची मागणी होती. त्याची दखल घेत टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीने घरगुती दराने वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.
























































