फेडरर फ्रेंच ओपनमध्ये खेळणार

स्वित्झर्लंडचा सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररने या वर्षी फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. आपण फ्रेंच ओपनसह जिनेवा ओपनमध्येही खेळणार असल्याची घोषणा 39 वर्षीय फेडररने ट्विटरवरून दिली.

रॉजर फेडररला गतवर्षी दुखापतीमुळे कुठल्याही मोठय़ा स्पर्धेत खेळता आले नव्हते. दुखापतीतून सावरल्यानंतरही कोरोनामुळे त्याने अनेक स्पर्धांतून माघार घेतली होती. फ्रेंच ओपनमध्ये खेळण्याबद्दल माहिती देताना रॉजर फेडरर म्हणाला, सर्व चाहत्यांना सांगताना आनंद होत आहे की, मी जिनेवा व पॅरिसमध्ये खेळणार आहे. तोपर्यंतचा माझा वेळ सरावासाठी असेल. स्वित्झर्लंडमध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.

20 ग्रॅण्डस्लॅम पदकांचा मानकरी असलेला फेडरर ऑगस्टमध्ये 40 वर्षांचा होणार आहे. गतवर्षी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ओपननंतर तो कोर्टवर उतरला नव्हता. मागील महिन्यात कतार ओपनमध्ये पुनरागमन करताना त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. फ्रेंच ओपन स्पर्धा या वर्षी 30 मेपासून सुरू होणार आहे. म्हणजेच आपल्या निर्धारित वेळापत्रकापेक्षा आठवडाभर ही स्पर्धा उशिराने होत आहे. या स्पर्धेसाठी प्रेक्षकही असायला हवे असे आयोजकांना वाटतेय. रॉजर फेडररने याआधी 2019 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी उपांत्य लढतीत राफेल नदालने त्याला हरविले होते.

आपली प्रतिक्रिया द्या