
अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱया ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम याने शुक्रवारी फ्रेंच ओपन टेनिस या ग्रॅण्डस्लॅममधील पुरुषांच्या एकेरीत जबरदस्त कामगिरी करीत पुढल्या फेरीत प्रवेश केला. डॉमिनिक थीमने कॅस्पर रूड याचा 6-4, 6-3, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱया सीडेड टेनिसपटूने दोन तास व 15 मिनिटांमध्ये विजय मिळवला.
स्वितोलीना पुढल्या फेरीत
महिला एकेरीत तिसरी सीडेड एलीना स्वितोलीना हिने रशियाच्या इकतेरीना ऍलेक्झॅण्ड्रोवा हिला 6-4, 7-5 अशा फरकाने पराभूत केले आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला. युक्रेनच्या टेनिसपटूने ही लढत 1 तास व 40 मिनिटांमध्ये जिंकली. याआधी फ्रेंच ओपन स्पर्धेत अंतिम आठमध्ये दोन वेळा पोहोचण्याचा अनुभव एलीना स्वितोलीनाकडे आहे.
बुचर्ड पराभूत
माजी सेमी फायनलिस्ट युजेनी बुचर्ड हिला फ्रेंच ओपन स्पर्धेत शुक्रवारी पराभवाला सामोरे जावे लागले. बिनसीडेड पोलंडच्या इगा स्वीतेकने तिचे आव्हान 6-3, 6-2 अशा फरकाने परतावून लावले आणि चौथ्या फेरीत प्रवेश केला. ही लढत 1 तास व 14 मिनिटे रंगली.




























































