
कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या लेखक प्रा. कृष्णकुमार गावंड लिखित ‘अविस्मरणीय’ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, 1 एप्रिलला दादर सार्वजनिक वाचनालय (दासावा) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘अविस्मरणीय’मध्ये हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कलाकारांवरचे मनस्वी प्रेम, आवाजाचा जादूगार अमीन सयानी, संगीतकार दत्ता डावजेकर, उषा खन्ना, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बापू नाडकर्णी, अजित वाडेकर, क्रिकेट प्रशिक्षक अण्णा वैद्य अशा महान व्यक्तींच्या कारकीर्दीवर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यावेळी उदवेली बुक्सचे प्रकाशक विवेक मेहेत्रे, ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, लेखक, निर्माते अशोक समेळ, अभिनेते, लेखक नारायण जाधव, शिवाजी धुरी उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार आहेत. कार्यक्रमानंतर दासावा आणि स्वरमुग्धा आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांना संगीतमय आदरांजली वाहण्यात येणार आहे. सिनेअभ्यासक विवेक पुणतांबेकर आणि लेखक प्रा. कृष्णकुमार गावंड कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.





























































