
एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन यांसारखी उपकरणे ऊर्जा वाचवतात खरी, पण याच उपकरणांच्या किमती आता ग्राहकांना ‘भोवळ’ आणणार आहेत. चालू महिन्याच्या अखेरीपासून वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी उपकरणे 5 ते 10 टक्क्यांनी महाग होणार आहेत. तसेच फ्रीज आणि एसीच्या किमतीत जानेवारीपासून 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
सरकारच्या ‘एनर्जी एफिशिअन्सी प्रोग्रॅम’ अंतर्गत उपकरणे बनवणाऱया कंपन्या चालू महिन्याच्या अखेरीपासून वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव ओव्हनची स्टार्स असलेली नवी उपकरणे बाजारात आणणार आहेत. ही उपकरणे कमी ऊर्जा वापरतात, त्यामुळे वीज बिलही कमी येते. या उपकरणांवर एप्रिलपासून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी, त्यांचा उत्पादन खर्च वाढून किमती उसळणार आहेत. वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव ओव्हनच्या किमतीत 1000 ते 3000 रुपयांची वाढ होऊ शकते. पाच स्टार्स असलेल्या उपकरणांच्या किमतीत सर्वाधिक वाढ होणार आहे. दरम्यान, जी उपकरणे आधीपासूनच स्टार रेटिंग नियमावलीचे पालन करताहेत त्यांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले.
नियमावलीचा फटका
सरकार ऊर्जासंबंधी नियमावली पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून आणखी कठोर बनवणार आहे. परिणामी, फ्रीज आणि एसीसारखी उपकरणे खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला 8 ते 10 टक्के दरवाढीचा भुर्दंड बसणार आहे.
अशी होईल दरवाढ
फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या सात किलोच्या टॉप लोडेड फुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीनची किंमत 22,990 रुपयांवरून 24,500 रुपये होणार.
सेमी-ऑटोमेटिक वॉशिंग मशीनची किंमत 14 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये होणार.
सध्या 23,500 रुपयांत मिळणारे मायक्रोवेव्ह ओव्हन 25 हजार रुपयांपर्यंत महागणार
























































