
दारु पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. हडपसर पोलिस ठाण्यातंर्गत परिसरात तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार मे महिन्यात दाखल करण्यात आली होती. संबंधित तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. विक्की अशोक रणदीवे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे तर विशाल उर्फ विक्की राजु पिल्ले (वय 24, रा. हिंगणेमळा, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधून 10 मे रोजी विशाल बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ चेतनने दिली होती. त्यानंतर 15 मे रोजी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॅनोलमध्ये एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह वाहत आला होता. त्यानुसार पोलिसांनी चेतनला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलाविले होते. त्यावेळी तो मृतदेह भाऊ विशालचा असल्याचे चेतनने पोलिसांना सांगितले. विशालचा खून दारू पिताना झालेल्या वादातून रणदिवेने केल्याची माहिती पोलिस नाईक मोहसीन शेख यांना मिळाली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानेच विशालचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. त्यानुसार पोलिसांनी रणदीवेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दारु पिण्याच्या वादातून विशालचा गळा दाबून खुन केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलिस उपनिरीक्षक प्रताप शेळके, किशोर वग्गु, मोहसीन शेख यांच्या पथकाने हा तपास केला.

























































