ओव्हलवर हिंदुस्थानी फलंदाजांचा बोलबाला, गावसकरांपासून कोहलीपर्यंत अनेक दिग्गजांच्या संस्मरणीय खेळय़ांचा नजराणा

इंग्लंडच्या ऐतिहासिक ओव्हल मैदानावर हिंदुस्थानी फलंदाजांनाचा नेहमीच बोलबाला राहिलाय. हेच असे मैदान आहे जेथे सुनील गावसकरपासून ते विराट कोहलीपर्यंत, तर गुंडाप्पा विश्वनाथपासून राहुल द्रविडपर्यंत अनेक फलंदाजांच्या बॅटीतून संस्मरणीय खेळी बहरल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत शतकाची बरसात करणाऱया हिंदुस्थानी फलंदाजा ओव्हलवरही शतकी झंझावात पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.

याच ओव्हल मैदानावर हिंदुस्थानने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली 1971 साली ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. तसेच या मैदानावर सुनील गावसकर यांनी 221 धावांची सर्वांगसुंदर खेळीही साकारली होती. 1979 साली झालेल्या कसोटीत हिंदुस्थानी संघ 202 धावांवर बाद झाल्यानंतर यजमानांनी हिंदुस्थानसमोर 438 धावांचे आव्हान दिले होते. तेव्हा गावसकर आणि चेतन चौहान या सलामीवीरांनी 213 धावांची सलामी देत सर्वांना तोंडात बोटे घालायला लावली होती. मग वेंगसरकरसह 153 धावांची भागी करत गावसकर यांनी आपले द्विशतकही पूर्ण केले होते. या कसोटीत हिंदुस्थानी संघ अवघ्या 9 धावांनी विजयापासून वंचित राहिला होता. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानने 8 बाद 429 अशी मजल मारली होती आणि कसोटी अनिर्णितावस्थेत संपली होती.

ओव्हल हिंदुस्थानी संघ जसा संस्मरणीय घटनांचा साक्षीदार आहे तसा काही पराभवांनाही सामोरा गेला आहे. गेल्या कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना हिंदुस्थानने न्यूझीलंडविरुद्धह याच ओव्हलवर गमावला होता. तसेच 2011 ते 2018 पर्यंत खेळल्या गेलेल्या तिन्ही कसोटी सामन्यांत हिंदुस्थानला पराभवाची हॅटट्रिक सहन करावी लागली होती. जरी या घटना ओव्हल घडल्या असल्या तरी गुंडाप्पा विश्वनाथ यांची 134 धावांची खेळी याच मैदानाने पाहिलीय. 2002 साली राहुल द्रविडने 217 धावांची खेळी करत मालिका 1-1 अशा बरोबरीत संपवली होती. 2021 साली रोहित शर्माच्या शतकाने हिंदुस्थानला 157 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता.

ओव्हल हे हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसाठी नेहमीच खास राहिले आहे. क्लासिक स्टाइलपासून ते आक्रमक आधुनिक फलंदाजीपर्यंत अशा अनेक प्रकारच्या शैलींनी आपला ठसा उमटवला आहे. पुन्हा एकदा अशीच आठवण ओव्हलवर ताजी व्हावी, अशी क्रिकेटप्रेमींची माफक अपेक्षा आहे.