साय-फाय: वृद्धत्वाकडून तारुण्याकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रसाद ताम्हनकर

शीर्षक वाचून गोंधळलात का? नाही, शीर्षक चुकलेले नाही आणि तुम्हीसुद्धा चुकीचे काही वाचलेले नाही. सध्या जगभर चर्चेत आलेल्या एक नव्या शोधाने हे शीर्षक सत्यात उतरवण्याचा दावा केला आहे. खरे तर कोणत्याही सजीवाचा प्रवास हा बालपण – तारुण्य – वृद्धत्व असा होत असतो. मात्र हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि बोस्टन युनिव्हर्सिटीच्या या संयुक्त संशोधनानंतर वयाला उलटे फिरवणे अर्थात वृद्धत्वाचा प्रवास उलटा तारुण्याकडे करणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या उंदरांवर यशस्वी झालेले हे संशोधन मानवावरदेखील यशस्वी झाल्यास येत्या काही वर्षांत 50 वर्षांची व्यक्तीदेखील 30 वर्षांच्या व्यक्तीएवढीच तरुण आणि तंदुरुस्त असेल. अगदी त्या व्यक्तीची त्वचादेखील तरुणासारखीच असेल.

शक्यतो वाढते वय कोणालाच नको असते. वाढते वय, वाढत्या वयाबरोबर गळत जाणारे केस, विविध आजार, सुरकुतलेली त्वचा हे लोकांना नको असते. त्यामुळे आज सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालल्याचे आपण बघत आहोत. म्हातारपणात क्षीण होत जाणारी ताकद, सांधेदुखीसारखे आजार असे विषयसुद्धा लोकांच्या मनात भविष्याची भीती निर्माण करत असतात. मात्र नुकत्याच झालेल्या या संशोधनाने अनेकांच्या चिरतरुण राहण्याचा आशा पल्लवित झाल्या असणार हे नक्की.

बोस्टन प्रयोगशाळेत वृद्ध आणि ताकद क्षीण झालेल्या उंदरांना अधिक निरोगी आणि मजबूत उंदरांमध्ये रूपांतरित करण्यात यश आले आहे. इतकेच नाही तर वयामुळे या काळात त्यांची कमजोर झालेली दृष्टीही बरी झाली आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि बोस्टन युनिव्हर्सिटीच्या या संयुक्त संशोधनानंतर संशोधक डेव्हिड सिंक्लेअर यांनी स्पष्टपणे सांगितले की, वयवाढीची प्रक्रिया उलटय़ा दिशेने फिरवणे शक्य आहे. या संशोधनात आणखी एक धक्कादायक शोध लागला आहे. वयाची प्रक्रिया फक्त मागे नाही तर पुढेही नेता येणे शक्य आहे. म्हणजेच एखाद्या तरुणाला वेळेआधीच वृद्ध बनवणेदेखील शक्य होणार आहे.

संशोधनात असे समोर आले आहे की, ज्याप्रमाणे आपण मोबाइल अथवा संगणकावर आपल्या महत्त्वाच्या डेटाची एक बॅकअप कॉपी ठेवलेली असते, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या शरीरात तरुणपणाची बॅकअप कॉपी असते. जर या कॉपीला ‘ट्रिगर’ केले तर पेशी पुन्हा निर्माण होतील आणि वय उलटेल. या संशोधनाचे यश बघता वाढते वय हा आनुवंशिक उत्परिवर्तनाचा (जेनेटिक म्युटेशन) परिणाम आहे हा सिद्धांत चुकीचा सिद्ध झाला आहे. ज्याच्यानुसार डीएनए कमकुवत होतो किंवा कालांतराने कमकुवत झालेल्या पेशी शरीराला कमकुवत बनवतात.

एखाद्या जुन्या, आऊटडेटेड संगणकावर नवे प्रगत सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे शक्य नसते किंवा केले तरी ते लगेच करप्ट होते. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा शरीरातील पेशी स्वतःचा डीएनए नीट वाचू शकत नाहीत तेव्हा वृद्धत्व येते. या संशोधनादरम्यान वृद्ध आणि कमकुवत दृष्टी असलेल्या उंदरांमध्ये ‘ह्युमन ऍडल्ट स्कीन सेल्स’ टोचण्यात आल्या. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची क्षीण झालेली दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. ज्याप्रमाणे दृष्टी पूर्ववत करण्यात यश आले, त्याचप्रमाणे पुढे मेंदू, स्नायू आणि मूत्रपिंडाच्या पेशीदेखील तरुण करणे संशोधकांना शक्य झाले आहे. सुमारे वर्षभर चाललेल्या या संशोधनाचा आवाका फार मोठा ठेवण्यात आला नव्हता. त्याची चाचणी फक्त एका लहान गटावर करण्यात आली होती. त्यामुळे शास्त्र्ाज्ञांना पूर्ण अशी खात्री नाही की, ही प्रक्रिया मानवांवर त्याच प्रकारे कार्य करेल.

एप्रिल 2022 मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्र्ाज्ञांनीदेखील या दाव्याशी मिळता जुळता दावा केला होता. त्यांनी त्याची मांडणी अधिक स्पष्टपणे केली होती. त्यांच्या संशोधनानुसार वय 30 वर्षांनी मागे घेता येणे शक्य होणार आहे. संशोधनासाठी संशोधकांनी त्वचेच्या पेशींचे ‘रिप्रोग्रामिंग’ केले, जेणेकरून त्या वर्षानुवर्षे मागे जाऊ शकतील. वृद्धत्वाच्या पेशींमध्ये हे ‘रिप्रोग्रामिंग’ कोलेजन तयार करण्याची क्षमता वाढवते. कोलेजन हे असे प्रथिन आहे, ज्यामुळे शरीर मजबूत आणि तरुण वाटते. ‘Multi-omic rejuvenation of human cells’ या नावाने हे संशोधन eLife जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. मात्र संशोधन नक्की किती लोकांवर झाले याबद्दल कोणतीही माहिती त्यात देण्यात आलेली नाही.

– [email protected]