सर जाडेजा अन् पंडित बुमरा!

>> संजय कऱ्हाडे

एक तो दिवस होता. 1990-1991 च्या रणजी अंतिम सामन्याचा. शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी 350 धावांचं आव्हान कपिल देवच्या हरयाणाने मुंबईसमोर ठेवलं होतं. याच मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 350 धावा करणं आवश्यक होतं. आणि सोमवारी लॉर्ड्सवर सामना जिंकण्यासाठी हिंदुस्थानला 4 बाद 58 या स्थितीनंतर आणखी 135 धावा जमवायच्या होत्या!

वानखेडेवर 3 बाद 34 अशा परिस्थितीनंतर मुंबईला दिलीप वेंगसरकर नावाच्या जिगरबाज फलंदाजाने एकहाती विजयाच्या उंबरठय़ावर उभं केलं. पहिल्या कसोटीत क्रॉली आणि डकेटने 188 धावांची सलामी देऊन रणशिंग फुंकल आणि सोमवारी लॉर्ड्सवर रवींद्र जाडेजाने 7 बाद 82 वरून 170 पर्यंत हिंदुस्थानच्या हातातोंडाशी घास आणलाच.

रणजी अंतिम सामना मुंबईने फक्त 2 धावांनी गमावला. नाबाद 139 धावा करणारा दिलीप वेंगसरकर गुडघ्यावर बसून मैदानावरच हमसाहमशी रडला. पहिल्या कसोटीत शेवटच्या दिवशी 350 धावा करून धडाकेबाज विजय मिळवणाऱया बेन स्टोक्सच्या डोळय़ातसुद्धा आनंदाश्रू आलेच असतील. आणि सोमवारी (सर) रवींद्र जाडेजा, (पंडित) जसप्रीत बुमरा आणि निर्भीड मोहम्मद सिराज या त्याच्या लढाऊ साथीदारांच्या डोळय़ातही पाणी तरळलेलं दिसलंच!

वेंगसरकर आणि जाडेजा त्या त्या दिवशी कागदावर हरले असतील, पण त्यांनी त्यांच्या खेळाने, काैशल्याने, जिगरी वृत्तीने सर्वांची मनं जिंकली यात वाद नाही. स्टोक्सच्या शिलेदारांनीसुद्धा त्यांच्या आक्रमकतेने सगळय़ांची दिलं काबीज केलीच. आधुनिक ऑलिम्पिकचा पुरस्कर्ता पिअर दी पुबर्तिन म्हणतो, ‘जिंकणं-हरणं महत्त्वाचं नाही. सहभागी होणं, जिंकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं अधिक महत्त्वाचं.’

शेवटी, स्टोक्सचं जाडेजाला मिठी मारणं, गिलने स्टोक्सचं काैतुक करणं यातच खेळाचं जिंकणं साध्य झालं. आपल्या संघाला सांगणं एवढंच की, हे असे सगळे थोर, श्रेष्ठ, महान, भव्य, दिव्य, उदात्त असे विचार व्यक्त करणं आपण जिंकल्यानंतर छान वाटतं. म्हणजे आपण जिंकल्यावर अन् ते हरल्यावर! असो. पुन्हा प्रयत्न करा. जिंकलात, आमचा सलाम. प्रयत्नांती हरलात, आमची साथ. नाहक शरणागतीला मात्र माफी नाही…