
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यात आता येणाऱ्या काळात अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत. त्यामुळे लहानमोठय़ा अशा उद्योजकांनी रोजगार मिळण्याच्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी येथे केले. कोकण उद्योग फोरमच्या वतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावर सुरू असलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
राज्य सरकार लहान-मोठय़ा उद्योगांना चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या 70 हजार उद्योग सुरू झाले असून सुमारे 16 लाख कामगार रुजू झाले आहेत. अलीकडेच राज्य सरकारने काही परदेशी कंपन्यांसोबत 24 हजार कोटींचे सामजंस्य करार केले आहेत. यातील बरेच उद्योग हे कोकणात सुरू होणार आहेत. परिणामी कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी मिळणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
कोकणात फळफळावळ मोठय़ा प्रमाणात असल्याने तिथे कच्चा माल मिळण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे तिथे यावर प्रक्रिया करणारे साठवणूक करणारे उद्योग सुरू केल्यास उद्योजकांना त्याचा फायदाच होईल. शिवाय येथे समूह विकास योजनाही राबविली जात आहे. यासाठी 10 कोटी रुपये उपलब्ध आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्य सरकार चालना देत असून प्रक्रिया उद्योग केल्यास त्यासाठी प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था शासनाने केली आहे, असे देसाई म्हणाले.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी 500 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आलेली आहे. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव आहे. सेवा उद्योगासाठी 10 लाख तर मोठय़ा भांडवलासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनांमध्ये उद्योजकांचा हिस्सा केवळ 10 टक्के असेल. बाकीचे सर्व पैसे राज्य सरकार घालणार आहे. राज्य सरकारने हमी घेतल्याने बँकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे.
नवउद्योजकांना संधी
एमआयडीसी नव्या उद्योजकांसाठी गाळे मिळणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यातील नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने तंत्रज्ञान क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या जिह्यांना ‘इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट’चा दर्जा दिला जातो. महाराष्ट्रातून रत्नागिरी जिह्याचा यासाठी विचार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.




























































