फळ विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। राहुरी

कणगर गुहा रोडवरील मुसमाडे वस्तीत रविवारी सकाळी एका फळविक्रेत्याचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मच्छिंद रावसाहेब मुसमाडे (४०) असे त्याचे नाव आहे. मृतदेहाच्या गळ्याला ओरखडे असल्याने वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मच्छिंद्र यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मच्छिंद्र यांचा व्हिसेरा फॉरेन्सीक लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल.

मच्छिंद्र हा नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी हद्दीत फळे विक्रीचा व्यवसाय करत होता. शनिवारी रात्री तो घराबाहेर झोपला होता. रविवारी सकाळी घरच्यांना तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या गळ्याभोवती ओरखडे होते. यामुळे रात्री त्याच्यावर एखाद्या प्राण्याने हल्ला केला असावा असे बोलले जात आहे. दरम्यान मच्छिंद्र मृत झाल्याची माहिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी केली होती. मच्छिंद्रचा मृत्यू अशा प्रकारे झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान शवविच्छेदनानंतर मच्छिंद्रचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी कणगर येथे मच्छिंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले.