फळव्यवसायिकाला एटीएम अपडेट पडले 15 लाखांना

एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका होलसेल फळव्यावसायिकाला तब्बल 14 लाख 50 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होलसेल फळव्यावसायिक असून कोथरुडमध्ये राहायला आहेत. काही महिन्यांपुर्वी सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या वेळोवेळी बँकेतून रक्कम वर्ग करुन घेतली. एटीएम अपडेट होत असून, तुमची रक्कम पुन्हा जमा केली जाणार आहे, असे सांगत सायबर चोरट्याने त्यांना 14 लाख 50 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.

म्हणून व्यावसायिक देत होते ओटीपी

सायबर चोरट्याकडून संबंधित व्यावसायिकाला वेळोवेळी फोन केला जात होता. त्यानंतर गोड बोलून एटीएम कार्ड अपडेट करुन देण्यासह बँकेतील वजा झालेली रक्कम परत देण्याच्या आमिषाने सायबर चोरटा व्यावसायिकाकडून मोबाईलवरील ओटीपी मिळवित होता. रक्कम परत मिळविण्यासाठी फळव्यावसायिक सायबर चोरट्याला ओटीपी देत होते. तब्बल 14 लाख 50 हजारांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

आपली प्रतिक्रिया द्या