परभणीच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने फळांचे भाव गडगडले

सामना प्रतिनिधी, परभणी

पंधरा दिवसापूर्वी संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पावसाचा फटका बसला. या फटक्यामुळे विविध फळांची आवक परभणीच्या बाजारपेठेमध्ये मोठया प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महागड्या सफरचंदापासून स्वस्त असणाऱ्या टरबुजापर्यंत सर्वच भाव गडगडल्याचे चित्र दिसून येत आहे. फळे नाशवंत असल्याच्या कारणाने मिळेल्या भावाने फळविव्रेâते विक्री करत असताना दिसून येत आहे. त्यात भरीस भर उष्णतेची लाट आल्यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली आहे. परिणामी फळ विक्रत्यांनी आपले विक्रीचे दर कमी केले आहेत.

परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रबी हंगाम तोट्यात गेला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या आहेत. टरबूज, खरबूज आणि अंजीर ही फळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करीत परभणीच्याबाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीला आली आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी फळांचे सेवन केले जाते. त्यामुळे या फळांना मागणीही वाढली आहे. सद्यस्थितीला परभणी बाजारपेठेत दररोज साडेतीन क्विंटल द्राक्ष्यांची आवक होत आहे. बार्शी, नागस या भागातून माणिक चमन, सुपर सोना, कॅप्सूल या वाणांचे द्राक्ष बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. तर जिल्ह्यात उत्पादित झालेले खरबूज सध्या स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे. दररोज 5 ते 10 क्विंटल टरबुजांची विक्री होते. खरबुजांमध्ये केसर आणि चक्री असे दोन प्रकार ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत. तालुक्यातील सिंगणापूर, पूर्णा तालुक्यात अंजीराचे उत्पादन अधिक असून, हे अंजीर बाजारपेठेत उपलब्ध आहेत. साधारणत: दोन क्विंटल अंजीरची दररोज विक्री होते. त्याच प्रमाणे टरबुजांनाही मागणी आहे. किरण, शुगरकिंग या वाणाच्या टरबूजांना ग्राहकांची मागणी आहे.

दरम्यान, विविध फळांचे दर घसरले असल्याची बोलकी आकडेवारी समोर आली आहे. प्रतिकिलो द्राक्ष 70 रुपये, खरबूज 20 रुपये, अंजीर 60 रुपये, डाळींब 60 रुपये, सफरचंद 120 रुपये, टरबूज 15 रुपये, आंबा (दशहरी)100 रुपये, आंबा (बादाम) 80 रुपये, मोसंबी, डाळिंबाची तर काही फळांचा बहार संपत आल्याने आवक घटली आहे. त्यामध्ये मोसंबी, डाळींब आणि सफरचंद या फळांचा समावेश आहे. ही फळे पर जिल्ह्यातून येथील बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. मात्र आवक घटल्याने या फळांचे भाव वधारले आहेत. उन्हाळ्यात आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. परभणीकरांची आंब्याची प्रतीक्षा संपली आहे. गावरान आंबे अजूनही बाजारपेठेत दाखल झाले नसले तरी दशहरी आणि बादाम या जातीचे आंबे सध्या बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे. द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत.