पेट्रोल-डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारने हिंदुस्थानच्या नागरिकांना इंधन दरवाढीचा तिसरा झटका दिला आहे. सध्या नौतपा सुरू होणार असून नागरिक कडक उन्हामुळे होरपळून निघत असतानाच सरकारने नऊ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करून सर्वसामान्यांचा जाळ काढला आहे. आजपासून पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महाग झाले आहे. याशिवाय राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमतदेखील एक रुपया प्रतिकिलोने वाढली आहे. काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.

मोदी सरकारने 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर 3 रुपये प्रतिलिटरने वाढवले होते. त्यानंतर 19 मे रोजी आणखी 90 पैसे प्रतिलिटरने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्या. आज पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत आता पेट्रोल 108.49 रुपये तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर एवढा झाला आहे. मोदी सरकार इंधन दरवाढीचे असे अनेक झटके देणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला होता. याशिवाय आणखी इंधन दरवाढ होण्याची शक्यता आरबीआय तसेच विविध अर्थतज्ञांनी वर्तविली होती. आता सरकारने तिसरी दरवाढ केली आहे. यामुळे महागाई भडकणार असून महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळणार आहे.

सरकारकडून जनतेची लूट – खरगे

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मोदी सरकारमध्ये नेतृत्त्वाची समस्या निर्माण झाली असून इतर देश त्यांच्या नागरिकांना दिलासा देत असताना भाजप सरकार मात्र जनतेची लूट करत आहे. ज्यावेळी कच्च्या तेलाचे दर कमी होते त्यावेळीदेखील सरकारने दिलासा न देता दररोज एक हजार कोटी रुपयांचा पेट्रोल आणि डिझेलवर कर लादला होता,’ असे खरगे म्हणाले.

पाकिस्तानमध्ये पुन्हा पेट्रोल डिझेल स्वस्त

हिंदुस्थानात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असताना पाकिस्तानात स्वस्ताईचे दिवस आले आहेत. पाकिस्तानात गेल्या आठवडाभरात दुसऱयांदा इंधनाची दरकपात करण्यात आली आहे. पेट्रोल 6 रुपये आणि हाय स्पीड डिझेल 6.80 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानात पेट्रोल 403.78 आणि डिझेल 402.78 रुपये प्रतिलिटर असे दर झाले आहेत.

आणखी दरवाढीसाठी तयार राहा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रतिबॅरलपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अनेक महिने इंधनाचे दर स्थिर ठेवणाऱ्या तेल कंपन्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी ही दरवाढ केली जात आहे. एकदम मोठी दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने किमती वाढवण्यात येत आहेत. तेल कंपन्यांना आजच्या दरवाढीनंतरही दररोज 500 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. त्यामुळे यापुढेही दरवाढ होतच राहणार आहे.

ईएमआयवर पेट्रोल मिळणार

भाजपचे खासदार व्ही. डी. शर्मा यांच्या पत्नी स्तुती मिश्रा यांनी इंधन दरवाढीवरून सरकारची ‘स्तुती’ करत मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. लवकरच तुम्हाला बँकेकडून होम लोन, कार लोनप्रमाणे पेट्रोल आणि डिझेल लोनदेखील मिळेल. युद्ध कोणाचे, पण नुकसान सर्वसामान्य जनतेचेच होत आहे, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.